गेवराई : प्रतिनिधी (विष्णु गायकवाड) : पुन्हा ती शाळा, पुन्हा ती घंटा, पुन्हा तो वर्ग, या आठवणींना उजाळा देत गेवराई येथील १९८८-८९ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३८ वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमिलन मेळाव्याच्या माध्यमातून शाळा पुन्हा गजबजून टाकली.
येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवार, दि. ३ एप्रिल रोजी हा भावनिक सोहळा पार पडला. मुख्याध्यापक प्रवीण पंडित यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात त्या काळातील शिक्षक टी.डी. शिंदे, नारायणराव मोटे, दि. गो. मुंढे, आबासाहेब कराळे, नागरे सर, चव्हाण सर, श्रीमती शोभाताई देशमुख, खडके सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. मिलिंद मुळे, मुकेश बजाज, मनिष वाधवाणी, दीपक निकाळजे, प्रविण कुलकर्णी, प्रशांत जाकीटे, समीर जाधव, गोविंद हिटनाळीकर, महेंद्र बाप्ते, डॉ. राजेश सिकची, प्रा. कैलास ठोंबरे, साईनाथ बेदरे, कैलास जवंजाळ, अशोक जायभाये, आनंद मंघारामणी आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
कार्यक्रमात सिनेअभिनेते डॉ. सुधीर निकम, प्रकाश भुते आणि रामेश्वर चातुर यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. तसेच माजी नगराध्यक्ष प्रशांत भागवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकूंद टाक यांनी केले, तर सूत्रसंचालन कृषी अधिकारी भरत कोरडे यांनी केले. उपस्थितांचे आभार लोककला अभ्यासक शाहीर विलास सोनवणे यांनी मानले.
या स्नेहमिलनामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून, गेवराईत एक आगळावेगळा आणि भावनिक वातावरण निर्माण झाले.






















