निलेश ठाकरे (महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) : मुंबई महाराष्ट्र शासनाने गुरुवारी राज्यातील सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणातील बदल्या जाहीर केल्या आहेत. प्रशासनातील कार्यक्षमता वाढविणे, तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी या बदल्यांना महत्त्वाचे मानले जात आहे. एकूण २५ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व बदली आदेश प्रसिद्ध करण्यात आले असून अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये नवे जिल्हाधिकारी नियुक्त झाले आहेत.
या बदल्यांमध्ये श्री. विनय गौडा यांची चंद्रपूर येथून छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे, तर डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची बुलढाणा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुलढाण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना पुणे येथे पशुसंवर्धन आयुक्तपदी नेमण्यात आले आहे.
तसेच डॉ. भारत बास्टेवाड यांना लातूर जिल्हाधिकारी, तर डॉ. विजय राठोड यांना कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. गोंदिया जिल्हाधिकारीपदी डॉ. मंगेश गोंदवले यांची नियुक्ती झाली असून श्रीमती वसुमाना पंत यांच्याकडे चंद्रपूर जिल्हाधिकारीपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
महत्त्वाच्या शहरी प्रशासनातही बदल करण्यात आले आहेत. श्री. अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे, तर डॉ. राजेंद्र भारुड यांना कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून नेमण्यात आले आहे. तसेच श्रीमती अंजली शर्मा यांची जालना महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद स्तरावरही अनेक बदल झाले असून श्री. सत्यम गांधी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे, तर श्रीमती संजीता मोहपात्रा यांची सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
याशिवाय श्री. कार्तिकेयन एस. यांची सोलापूर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून सध्याचे जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
या व्यापक बदल्यांमुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत नवचैतन्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी आणि स्थानिक स्तरावर प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी या बदल्या महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.






















