निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव व योगेश कर्डिले): निफाड तालुक्याचे शान आणि नव्यानिर्वाचित आमदार, निफाडचे भूमिपुत्र गोकुळ भाऊ गीते यांचा करंजगाव ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि संख्येने भव्य सत्कार केला.
करंजगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभात शिवसेनेचे निफाड तालुका अध्यक्ष खंडू पाटील बोडके यांच्या हस्ते गोकुळ भाऊ गीते यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन जाहीर गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार गोकुळ भाऊ गीते म्हणाले, “निफाडच्या जनतेने जो विश्वास दाखवला, त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. करंजगावसह संपूर्ण तालुक्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. पाणी, रस्ते आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही माझी प्राथमिकता असेल.”
तालुकाध्यक्ष खंडू पाटील बोडके यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “गोकुळ भाऊ हे आपल्या मातीतले नेतृत्व आहे. त्यांच्या रूपाने निफाडला कर्तव्यदक्ष आमदार मिळाला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.”
या कार्यक्रमाला करंजगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला-पुरुष उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गीते यांचे स्वागत करण्यात आले.






















