परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : गंगाखेड तालुक्यातील भूमिपुत्र आणि भारतीय सैन्यात कर्तव्य बजावणारे जवान सचिन राठोड (वय 31) यांचे आजाराने निधन झाले. ही दुर्दैवी घटना घडताच संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
सचिन राठोड हे मागील 12 वर्षांपासून भारतीय सैन्यात कार्यरत होते. देशसेवेचे व्रत घेत त्यांनी जम्मू-काश्मीर, पंजाब, अरुणाचल प्रदेश, राजस्थान अशा विविध संवेदनशील भागांमध्ये कर्तव्य बजावले होते. सध्या ते कोलकाता येथील पूर्व कमांड सेकंड बटालियनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सेवेत होते.
काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना कोलकाता येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
सचिन राठोड हे गंगाखेड तालुक्यातील बोर्ड तांडा येथील रहिवासी होते. त्यांच्या निधनामुळे गावासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. गावकऱ्यांनी “देशासाठी सेवा करताना आपला मुलगा गमावला” अशा भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, भारतीय लष्कराच्या वतीने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आहे.
देशसेवेसाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या या वीर जवानाच्या निधनामुळे परिसरात शोक व्यक्त होत असून, त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.






















