ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कोलोप्रोक्टोलॉजी आयएससीपी असोसिएशन ऑफ सर्जन्स नागपूर आणि आय.एम.ए. (IMA) ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी ४ आणि ५ जुलै २०२६ रोजी ब्रह्मपुरी येथे ‘FISCPCON’ या राष्ट्रीय स्तरावरील द्विविसीय कार्यशाळा व परिषदेचे (कॉन्फरन्स) भव्य आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक लाडुकर सर्जिकल हॉस्पिटल येथे ही परिषद पार पडणार असून, ग्रामीण भागातील वैद्यकीय क्षेत्रासाठी हा उपक्रम मोलाचं ठरणार आहे.
या कार्यशाळेत देशभरातून २० नामांकित शल्यचिकित्सक सर्जन्स उपस्थित राहणार आहेत. हे तज्ज्ञ उपस्थित डॉक्टरांना ‘कोलोप्रोक्टोलॉजी’ (शौचमार्गाचे व मोठ्या आतड्याचे आजार) या विषयावर सखोल मार्गदर्शन करतील. तसेच या आजारांशी संबंधित जुन्या व आधुनिक शस्त्रक्रिया पद्धतींवर विस्तृत चर्चा व या परिषदेत केला जाईल. ग्रामीण भागातील डॉक्टरांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यासाठी ही परिषद अत्यंत उपयुक्त ठरेल.
या परिषदेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत ३५ गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या रुग्ण संशोधन शिबिरामध्ये ६० रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी सर्व वैद्यकीय निकष पूर्ण केलेल्या ३५ रुग्णांची निवड करण्यात आली असून, या दोन दिवसांच्या कार्यशाळेत तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया केल्या जातील.
या ऐतिहासिक कार्यक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ८:०० वाजता ‘कृष्णा सेलिब्रेशन हॉल’, ब्रह्मपुरी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. विजयभाऊ वडेट्टीवार भूषवणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विख्यात तज्ज्ञ डॉ. सुब्रजीत दासगुप्ता उपस्थित राहतील. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री. अतुल देशकर, ब्रह्मपुरीचे प्रथम माजी नगराध्यक्ष अशोकजी भैय्या, नगरपालिकेचे अध्यक्ष योगेश मिसार आणि मुख्याधिकारी माधुरी सलामे प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
ब्रह्मपुरी सारख्या निमशहरी भागात वैद्यकीय क्षेत्रातील हा अत्यंत मोठा आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा उपक्रम होत आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आणि उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी ब्रह्मपुरी व परिसरातील सर्व डॉक्टरांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लाडुकर सर्जिकल हॉस्पिटलचे संचालक डॉ. लक्ष्मीकांत लाडुकर यांनी केले आहे.



















