एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिषकुमार चौहान : “गुंतवणूक म्हणजे विश्वास, ज्ञान आणि शिस्त

एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिषकुमार चौहान : “गुंतवणूक म्हणजे विश्वास, ज्ञान आणि शिस्त

दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगनिमित्त नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (NSE) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिषकुमार चौहान यांनी गुंतवणुकीतील मूल्यांवर भर देणारा संदेश दिला. मुहूर्त ट्रेडिंग हा केवळ शुभ मुहूर्त नसून, आर्थिक प्रवासाला मार्गदर्शन करणाऱ्या विश्वास, ज्ञान आणि शिस्त या महत्त्वपूर्ण घटकांवर चिंतन करण्याचा प्रसंग असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतात भांडवली बाजारात गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढत असताना, जागरूकता आणि माहितीपूर्ण निर्णयक्षमता अधिक महत्त्वाची बनत असल्याचे चौहान यांनी स्पष्ट केले. सुजाण गुंतवणूकच दीर्घकालीन समृद्धी निर्माण करू शकते, असे ते म्हणाले. गुंतवणूक ही केवळ संपत्ती वाढवण्याचे साधन नसून, देशाच्या वेगाने वाढणाऱ्या आर्थिक विकासकथेचा भाग होण्याची संधी आहे, असे त्यांनी नमूद केले.

चौहान पुढे म्हणाले की, एनएसई पारदर्शक, सुरक्षित आणि समावेशक असा बाजारपेठीय वातावरण निर्माण करण्यास कटिबद्ध आहे, ज्यामध्ये प्रत्येक गुंतवणूकदारास विश्वासाने आणि जबाबदारीने प्रगती करता येईल. दिवाळीच्या नवीन सुरुवातीसोबत ज्ञान आपल्या निर्णयांना दिशा देओ आणि शहाणपण यशाला आकार देवो, अशा शब्दांत त्यांनी सर्वांना समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या प्रबुद्ध दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.