पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) च्या बससेवेबाबत शेवाळवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, प्रवाशांशी असंवेदनशील वर्तनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी बस डेपो येथे एक प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी गेटवर उभा राहून सतत दरवाजा ठोठावत होता. बसमध्ये त्याचा मोठा भाऊ आधीच प्रवास करत असून तोही चालक आणि वाहकांना आवाज देत होता. मात्र, या सर्व हाकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत चालकाने दरवाजा उघडण्यास नकार दिला.

विशेष म्हणजे, बसमधील वाहकाने (कंडक्टर) चालकाला दरवाजा उघडण्याची सूचना केली होती. तरीही चालकाने कोणतीही दखल घेतली नाही. या घटनेमुळे बसमधील तसेच परिसरातील प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
तक्रार प्रक्रियेतही अडथळे
सदर बस हडपसर डेपोची असल्याने या प्रकाराची तक्रार नोंदवण्यासाठी संबंधित नागरिक Hadapsar Bus Depot येथे गेले असता, “येथे तक्रार घेत नाही, दत्त मंदिर कार्यालयात जा, असे सांगण्यात आले. यानंतर नागरिकांनी दत्त मंदिर पीएमपीएमएल कार्यालय येथे भेट दिली. मात्र, तेथेही तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. अधिकाऱ्यांनी ‘समज देऊ’ असे मौखिक आश्वासन देत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

तसेच, “तिकीटवरील हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा” असे सांगण्यात आले. परंतु तिकीट व बस क्रमांक नसल्यास तक्रार नोंदवता येत नसल्याने सामान्य प्रवाशांसाठी न्याय मिळवणे कठीण ठरत असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय, हेल्पलाईनवर संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार आहे.
तक्रारच नाही- कारवाई कोणावर ?” प्रवाशांचा सवाल”
दररोज लाखो नागरिक PMPML बससेवेचा वापर करतात. त्यांच्या पैशातूनच ही सेवा चालते, तरी काही कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या असंवेदनशील वर्तनामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे.
जर त्या ठिकाणी PMPML चाच कर्मचारी असता, तर बस थांबली असती. पण सामान्य नागरिक असल्यामुळे त्याच्या हाकेला प्रतिसाद मिळाला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.
कारवाईची मागणी
या घटनेनंतर संबंधित चालक आणि वाहकावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित बस ही हडपसर डेपोची असल्याचे समोर आले असून, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन PMPML प्रशासनाने सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.






















