४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; गुन्हा फक्त चालकावर, ठेकेदार व प्रशासकीय जबाबदारीवर प्रश्नचिन्ह ?

४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; गुन्हा फक्त चालकावर, ठेकेदार व प्रशासकीय जबाबदारीवर प्रश्नचिन्ह ?

दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, राहुल आढाव):-  शहरातील बंगला साईड येथील जनता कॉलनी परिसरात भर दिवसा सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात रोड रोलरखाली सापडून ४ वर्षाच्या आर्यन संतोष जाधव या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 43/2026 अन्वये रोड रोलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी या कामाचे ठेकेदार व कामावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी मात्र गुन्ह्याबाहेरच राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पोलीस नोंदीनुसार, दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास, जनता कॉलनी रोडवर स्मगलर कॅफेजवळ आर्यन जाधव हा उभा असताना रोड रोलर चालक परशुराम शंकर राठोड (रा. अंकलगा, ता. जेवर्गी, जि. गुलबर्गा) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत पाठीमागे न पाहता भरधाव वेगात रोड रोलर चालवून मुलाला धडक दिली. धडकेनंतर रोड रोलर थेट चिमुकल्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

या प्रकरणी भा.न्या.स. का. कलम 106(1), 281, 125(a)(b) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद मुलाचे वडील संतोष मारुती जाधव यांनी दिली आहे. तपासाची जबाबदारी ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अविनाश गायकवाड यांच्याकडे असून, गुन्हा दाखल करण्याचे काम पो.हवा. 311 म्हेत्रे यांनी केले आहे.

मात्र, इतक्या गंभीर घटनेनंतरही गुन्ह्यात फक्त रोड रोलर चालकाचे नाव असून, संबंधित रस्त्याच्या कामाचा ठेकेदार, पर्यवेक्षक अभियंता किंवा कामास परवानगी देणारे शासकीय अधिकारी यांचा कुठेही उल्लेख नसल्याने मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षा बॅरिकेड्स, वॉचमन, सूचना फलक, कामाचे वेळापत्रक याबाबत जबाबदारी चालकाची की ठेकेदाराची, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर दौंड शहरातील काही भागांमध्ये रात्री १२ नंतरही रस्त्याची कामे सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. भर दिवसा चिमुकल्याचा जीव गेला, मग मध्यरात्रीनंतर सुरू असलेल्या कामांवर कोण नियंत्रण ठेवतो? असा संतप्त सवाल उपस्थित होत असून, प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांनी मागणी केली आहे की, फक्त चालकाला बळीचा बकरा न बनवता, संबंधित रस्त्याच्या कामाचा ठेकेदार, वर्क ऑर्डर देणारी यंत्रणा आणि देखरेख करणारे अधिकारी यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावेत.