राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची पाईप तोंडात घेऊन इंधन पिल्याने बिराम (वय २) या बालकाची प्रकृती गंभीर झाली असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना शुक्रवारी बामलाबे गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बिरामचे वडील रामलाल बंजारा ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत होते. त्यावेळी डिझेलची पाईप निष्काळजीपणे जमिनीवरच पडून राहिली होती. घराच्या अंगणात खेळत असलेल्या बिरामने ती खेळण्याचा समज करून तोंडात घेतली. त्यातून डिझेल त्याच्या पोटात गेल्याने काही वेळातच त्याला उलट्या होऊ लागल्या आणि तो बेशुद्ध पडला.
घाबरलेल्या कुटुंबीयांनी तत्काळ त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला प्रथम ब्यावरा येथील शासकीय रुग्णालयात, त्यानंतर पुढील उपचारासाठी राजगड जिल्हा रुग्णालयात हलविले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे पालकांच्या निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घराच्या परिसरात ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने, डिझेल, पेट्रोल किंवा इतर धोकादायक पदार्थ मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवणे किती आवश्यक आहे, याची ही घटना गंभीर जाणीव करून देते. छोट्याशा दुर्लक्षामुळे निरागस बालकाचा जीव धोक्यात येऊ शकतो, असा इशारा या घटनेने दिला आहे.






















