जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील ऑटो रिक्षा चालकांवर लादण्यात आलेल्या विविध शुल्क व नियमांविरोधात ऑटो रिक्षा चालक मालक संघटनांनी एकत्र येत ८ एप्रिल २०२६ रोजी जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर (आरटीओ) मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
ऑटो रिक्षा चालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीसाठी चालकांकडून ₹५०० प्रवेश फी आणि ₹३०० वार्षिक शुल्क आकारले जात असल्यामुळे चालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या रिक्षा चालकांवर हा अतिरिक्त भार अन्यायकारक असल्याचे संघटनांचे मत आहे.
संयुक्त कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले की, महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये ही सक्ती केली जात असून, नोंदणी न केल्यास परवाना नूतनीकरण, पासिंग इत्यादी कामे अडवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, ऑटो रिक्षा चालकांच्या हितासाठी स्वतंत्र व पारदर्शक कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यामार्फत विविध योजना राबवाव्यात, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असतानाही ठोस निर्णय न झाल्याने चालकांमध्ये असंतोष वाढला आहे.
८ एप्रिल रोजी होणाऱ्या या मोर्चात जळगावसह परिसरातील सर्व ऑटो रिक्षा चालक मालक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.






















