छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी संतोष खाजेकर) : तालुक्यातील चापानेर येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये मराठी, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांसाठी तीन विषय शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले असून ३० जून २०२६ रोजी एका माध्यमिक शिक्षकाचाही सेवानिवृत्तीमुळे कार्यकाळ संपला आहे. यापूर्वीच शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी किमान तीन विषय शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या मागणीची गंभीर दखल घेऊन आठ दिवसांच्या आत मराठी, इंग्रजी आणि विज्ञान विषयांसाठी शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास शाळेला कुलूप लावून शाळा बंद ठेवण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनावर ज्ञानेश्वर पंढरीनाथ घुले, सीमा गणेश हासणे, मनीषा संजय वडनेरे, दीपाली योगेश पवार, संजय तुकाराम हिलाले तसेच सामाजिक कार्यकर्ते युवराज रावसाहेब बोरसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





















