मी काय करतो ते पाहा’ – रशीद मामूंच्या उमेदवारीनंतर चंद्रकांत खैरे आक्रमक

मी काय करतो ते पाहा’ – रशीद मामूंच्या उमेदवारीनंतर चंद्रकांत खैरे आक्रमक

Times of Maharashtra : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांना उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. या निमित्ताने माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने मुंबईतील शिवसेना भवनात रशीद मामू यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला होता. मात्र, याचवेळी शिवसेना भवनाच्या प्रवेशद्वारात चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामू यांना जाहीरपणे फटकारले होते. “मी तुला उमेदवारी मिळू देणार नाही, माझा तुला ठाम विरोध आहे,” असे खैरे यांनी सर्वांसमोर सुनावले होते. त्यावेळी रशीद मामू यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र खैरे संतप्तपणे बोलत राहिले होते.

रशीद मामू यांना उमेदवारी दिल्यास “मी काय करतो ते पाहा,” असा इशाराही चंद्रकांत खैरे यांनी दिला होता. तरीही, खैरेंच्या तीव्र विरोधानंतर अंबादास दानवे यांनी रशीद मामू यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. त्यामुळे आता खैरे नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या अंतर्गत वादाचा थेट फटका ठाकरे गटाला निवडणुकीत बसणार का, हा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

काही दिवसांपूर्वीच अंबादास दानवे यांनी रशीद मामू यांचा पक्षप्रवेश घडवून आणत मुस्लिम मतदारांवर लक्ष केंद्रीत केले होते. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला राज्यभर, विशेषतः मुंबईत मुस्लिम मतदारांचे लक्षणीय पाठबळ मिळाले होते. त्याच धर्तीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये ही खेळी महत्त्वाची मानली जात होती. मात्र, या पक्षप्रवेशानंतर शिवसेना भवनाबाहेर रशीद मामू आणि चंद्रकांत खैरे आमनेसामने आले. गळाभेट घेण्याचा प्रयत्न करताच खैरेंनी त्यांना बाजूला सारत, “तुम्ही गळाभेट घेतली तरी तिकीट मिळणार नाही, असा सज्जड दम भरला होता. रशीद मामू यांच्या प्रवेशामुळे पक्षाचे तब्बल ५० हजार मतांचे नुकसान झाल्याचा दावाही खैरेंनी केला होता.