Times of Maharashtra Desk: पुण्यातील निवडणुकीच्या रिंगणात यंदा गुन्हेगारीच्या चर्चेत असलेल्या दोन टोळ्या एकमेकांविरुद्ध उभ्या राहणार आहेत. आंदेकर कुटुंबाच्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर, हत्या प्रकरणातील पीडित आयुष कोमकर यांच्या आई कल्याणी कोमकर यांनी थेट आंदेकर कुटुंबीयांविरुद्ध अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.कल्याणी कोमकर यांनी प्रभाग क्रमांक 23 मध्ये आपला अर्ज नोंदवला असून, यामुळे आंदेकर विरुद्ध कोमकर हा संघर्ष पुन्हा निवडणूक रिंगणात रंगणार आहे.
आयुष कोमकरच्या हत्येनंतर कल्याणी कोमकर यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, ती उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आंदोलनाची तयारी करत थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.कल्याणी कोमकर यांनी आंदेकर कुटुंबीयांच्या उमेदवारीवरुन अजित पवारांना पूर्वीच इशारा दिला होता. त्या म्हणाल्या, “आंदेकरांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार आहे. अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी मला उमेदवारी द्यावी. जर आंदेकरांना तिकीट दिले गेले, तर मी आंदोलन करेन.”
कोमल आंदेकर यांनी आरोपांवर प्रतिक्रिया देताना सांगितले, “वनराज आंदेकर माझा भाऊ आहे, पण आम्ही त्याच्या हत्येत काहीही केलेले नाही. आमचा कोणाशी वाद नव्हता. आंदेकरांना अपक्ष उमेदवारी द्या, पण पक्षाकडून नाही.”राजकीय वर्तुळात आता आंदेकर-विरुद्ध कोमकर या संघर्षाकडे लक्ष लागले असून, प्रभाग क्रमांक 23 मधील निवडणुकीत हा संघर्ष कोण जिंकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






















