पुणे :- जय गणेश…गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…च्या जयघोषणा सोबतच नादघोषात श्री हनुमान रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिकृतीत दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला.
मुख्य मंदिरापासून सकाळी ८.30 वाजता श्रीं च्या आगमन मिरवणुकीला प्रारंभ झाला. श्रीं ची विलोभनीय मूर्ती डोळ्यात साठविण्यासोबतच दर्शनासाठी भक्तांनी चौका-चौकात गर्दी केली.
मंदिरापासून निघालेली मिरवणूक तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडई मार्गे उत्सव मंडपात आली. मिरवणुकीमध्ये अग्रभागी देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड यांसह गंधाक्ष ढोल ताशा पथक देखील सहभागी झाले होते. मुख्य पूजा मिलींद राहुरकर यांच्या पौरोहित्याखाली झाली.
यावेळी डॉ.मोहन भागवत म्हणाले की, जगामध्ये शांती, सुबत्ता, परस्पर सौमनस्य नांदो. तसेच भारत हा सुख शांतीचा मार्ग दाखविणारा देश होवो. रोग मुक्त भारत होवो आणि हे सर्व संकल्प पुण्यापासून सर्व विश्वापर्यंत व्यापक होवो, अशी प्रार्थना गणराया चरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.





















