दौंड ( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) : दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरात एका महिलेवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली असून या प्रकरणी दौंड पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.
दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं. 188/2026 अन्वये बी.एन.एस. कलम 64(1), 118(1), 115(2), 351(2), 352 तसेच अ.जा./अ.ज.अ. (अत्याचार प्रतिबंध) कायदा कलम 3(1)(w)(i)(ii), 3(2)(v) व आर्म अॅक्ट कलम 3, 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 25 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास मुकादमवाडी, कुरकुंभ (ता. दौंड, जि. पुणे) हद्दीत ही घटना घडली. पीडित महिला पुण्याकडे जाण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनाची वाट पाहत असताना एका काळ्या रंगाच्या कारने थांबून लिफ्ट देण्याची ऑफर दिली. चालकाने पुण्यात सोडण्याचे सांगितल्याने महिला गाडीत बसली.
मात्र काही अंतरावर गेल्यानंतर आरोपीने अश्लील बोलणे करत जबरदस्तीचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करून गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच आरोपीने बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जबरदस्तीने महिलेला खाली ओढून तिच्यावर अत्याचार केला, तसेच मारहाण करून जखमी केले.
घटनेनंतर आरोपीने महिलेला धमकावून तेथून पळ काढला. मात्र महिलेने धैर्य दाखवत गाडीचा क्रमांक लक्षात ठेवला व तक्रार दिली.
या प्रकरणी आरोपी अमोल साहेबराव काळे (रा. खडकी, ता. दौंड, जि. पुणे) याला पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पीएसआय बिद्री हे पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






















