पावसाची हुलकावणी; शिरूरच्या पश्चिम भागात भीषण पाणीटंचाई

पावसाची हुलकावणी; शिरूरच्या पश्चिम भागात भीषण पाणीटंचाई

शिक्रापूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात यंदाच्या मान्सूनने अक्षरशः पाठ फिरवल्याने शेती, पाणीपुरवठा आणि पशुधन या तिन्ही आघाड्यांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. दीड महिन्यांहून अधिक काळ शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून, पाऊस न झाल्याने खरीप हंगामाची सुरुवातच धोक्यात आली आहे.

परिसरासाठी जीवनवाहिनी मानला जाणारा थिटेवाडी बंधारा पूर्णपणे कोरडा पडल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.

शिरूरच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने शेतांची मशागत पूर्ण केली. मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरणीचे नियोजन कोलमडले आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या दमदार पावसामुळे थिटेवाडी बंधारा शंभर टक्के भरला होता. त्याचा लाभ शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी वर्षभर झाला होता. मात्र, यंदा जूनअखेरपर्यंतही पावसाने हुलकावणी दिल्याने संपूर्ण परिस्थिती पालटली आहे.थिटेवाडी बंधारा कोरडा पडल्याने परिसरातील अनेक पाणीपुरवठा योजना संकटात सापडल्या आहेत. गावागावांतील विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असला, तरी वाढत्या मागणीमुळे तो अपुरा ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. शेतीसोबतच पशुपालकांसमोरही मोठे संकट उभे ठाकले आहे. पावसाअभावी हिरवा चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी काही दिवसांतही समाधानकारक पाऊस झाला नाही, तर शेतीबरोबरच दुग्धव्यवसायालाही मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या मते, पेरणीसाठी सर्व तयारी करूनही आभाळाने साथ दिली नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अनेकांनी बियाणे, खते आणि मशागतीवर खर्च केला असून, आता पाऊस न झाल्यास आर्थिक संकट आणखी गडद होणार आहे.

स्थिती चिंताजनक…

थिटेवाडी बंधारा पूर्णपणे कोरडा.

खरीप पेरण्या रखडल्या.

अनेक विहिरींनी तळ गाठला.

पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबित्व.

हिरव्या चाऱ्याअभावी पशुपालक अडचणीत.

शेतकऱ्यांमध्ये आर्थिक संकटाची भीती.

शेतकऱ्यांच्या भावना…

गेल्या दीड महिन्यापासून पावसाची प्रतीक्षा करत आहोत. थिटेवाडी बंधारा पूर्णपणे कोरडा पडला आहे. विहिरींना पाणी नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. पेरणीची सर्व मशागत करूनही पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. – स्थानिक शेतकरी