Times of Maharashtra Desk : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटामधील जागावाटपावरून तणाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमधील जागावाटपाबाबतची दुसरी महत्त्वाची बैठक आज, गुरुवारी, मुंबईतील दादर येथील भाजपच्या ‘वसंत स्मृती’ कार्यालयात होणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने २०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जिंकलेल्या ८२ प्रभागांवर आपला दावा कायम ठेवला आहे. तसेच ज्या प्रभागांमध्ये भाजपचा पराभव झाला, मात्र भाजप आणि इतर घटकांची एकत्रित मते विजयी शिवसेना उमेदवारांपेक्षा अधिक होती, त्या प्रभागांवरही भाजप दावा करत आहे. याशिवाय, काही प्रभागांमध्ये मोठ्या फरकाने पराभव झाला असला तरी भाजपने तेथेही जागावाटपाबाबत आग्रह धरला आहे.
भाजप २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीचा आधार घेत फक्त ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आघाडी सत्तेत आहे, त्या ठिकाणीच स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. मात्र, या दाव्याला शिंदे गटाने स्पष्ट विरोध केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०१७ नंतर मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड रचनेत बदल होण्याची शक्यता असल्याचे सांगत, २०१४ किंवा २०१७ च्या आकडेवारीवर आधारित जागावाटप योग्य ठरणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे. बदललेल्या प्रभागरचनेनुसार नव्याने मूल्यांकन करणे गरजेचे असल्याचा शिंदे गटाचा आग्रह आहे अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी ८ मतदारसंघांमध्ये भाजपने केवळ शिंदे गटालाच जागा सोडल्याचा मुद्दा वादाचा ठरला आहे. वांद्रे पश्चिम, अंधेरी पूर्व-पश्चिम, मागाठाणे, घाटकोपर पश्चिम यासह दादर, माहीम, वडाळा, चेंबूर आणि वरळी या मराठीबहुल भागांमध्ये भाजपने शिवसेनेसाठी मैदान मोकळे ठेवल्याबद्दल शिंदे गटाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आजच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेतील सर्व २२७ वॉर्डमधील इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावली आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असून, शिंदे गटाने स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांत शिंदे गोरेगाव, दहिसर आदी भागांतील शिवसेना शाखांना भेट देत संघटनात्मक बांधणीवर भर देत आहेत.
जागावाटपावरून सुरू असलेली ही रस्सीखेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करणारी ठरण्याची शक्यता आहे.






















