पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): हजारो कोटी ठेवी असलेल्या आणि हजारो कोटी रुपये कर्ज वाटप झालेल्या तसेच बुलडाणा येथून सुरू झालेल्या अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या पुणे ऑफीसमध्ये मोठा प्रशासकीय भूकंप झाल्याची चर्चा आहे. आतापर्यंत संस्थेची धुरा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात सांभाळण्याचे काम करणारे तसेच संस्थेच्या स्थापनेपासूनच कार्यरत असलेल्या सीईओ ने अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे संस्थेत मोठी खळबळ उडाली असून, अनेक कर्मचारीदेखील संस्था सोडण्याच्या तयारीत असल्याचे कळते. या प्रकारामुळे या पतसंस्थेत काहीतरी मोठी गडबड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बुलढाणा येथील एक व्यापा-याने सुमारे 35 वर्षांपूर्वी या पतसंस्थेची स्थापना केली आहे. तेंव्हापासून एकाच परिवारातील आणि जवळचा व्यक्ती (विद्यमान सीईओ) यांचेच या बँकेवर वर्चस्व राहिलेले आहे. गेल्या 35 वर्षांत या बँकेत आतल्या आत अनेक प्रकारचे घोटाळे झालेले आहेत. या घोटाळ्यांची नेहमीच चर्चा होत असते, परंतु प्रत्येक वेळी संस्थापक आणि त्यांचे सहकारी घोटाळे पद्धतशीरपणे मॅनेज करीत असतात. यापूर्वी काही वृत्तपत्र व मीडिया हाऊसेस यांनी या घोटाळ्यांना उजागर केले होते.
या पतसंस्थेच्या अनेक शाखांमध्ये आजवर घोटाळे मॅनेज करण्यात भलेही व्यवस्थापनाला यश आले असावे, परंतु गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील कार्यालयात चाललेल्या घोटाळ्यांवर अध्यक्षांचे नियंत्रण राहत नसल्याचे दिसत आहे. सीईओ हे अत्यंत बेमालूमपणे घोटाळे करीत असल्याची खात्रीशिर माहिती पुण्याच्या वर्तुळात व्यक्त होत आहे.
जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये संबंधित पतसंस्थेचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. एका माहितीनुसार हा व्यवहार अनेकांच्या अंगलट आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून संस्थापक आणि सीईओ यांच्यात चांगलेच बिनसल्याचे दिसत आहे. या बिनसण्यामागे बँकेत झालेला कोणतातरी मोठा घोटाळा असण्याची शक्यता आहे. सीईओ गेल्या अनेक वर्षांपासून संस्थापकांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करीत आहे. संस्थापक केवळ आपली मुलगी आणि जावयाला झुकते माप देत असल्याची सीईओंची खंत आहे. सीईओंनी अनेक वर्षे पतसंस्थेवर आपले वर्चस्व येण्याची वाट पाहिली. अखेर सीईओचाही बांध सुटला आणि संस्थापकही वैतागला, त्यामुळे अखेर या प्रकरणाची परिणती ही सीईओंच्या राजीनाम्यात झाली आहे.
या पतसंस्थेत आजवर कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेले आहेत. संस्थापक, त्याचे कुटुंबीय आणि त्यांचे काही जवळचे हस्तक यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून स्वत:च्या गडगंज इस्टेटी बनवून ठेवल्या आहेत. यात सीईओदेखील मागे नाही. सीईओंनी पण घोटाळ्यांची मोठी मालिकाच राबवलेली आहे.
सीईओकडून दिला गेलेला राजीनामा हा ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. पतसंस्थेच चाललेल्या घोटाळ्यांचा कुठेतरी मोठा स्फोट होणार यात शंका नाही. त्यामुळे आता पतसंस्थेशी निगडित ठेवीदार व खातेदारांनी याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.






















