जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जळगाव, दि. १० जुलै : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अमली पदार्थांविरोधात मोठी आणि धडक कारवाई करत लाखो रुपयांचे एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केले. या कारवाईत दोन संशयितांना रंगेहात अटक करण्यात आली असून, या रॅकेटचा मुख्य पुरवठादार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी व जिल्हापेठ पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार १० जुलै रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास शहरातील ‘जेएस ग्राऊंड’ परिसरात काही तरुण एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना पकडले.
कारवाईदरम्यान संशयितांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून जयेष तायडे (रा. हरीओम नगर, जळगाव) आणि हितेंद्र परदेशी (रा. तोफखाना परिसर, जळगाव) यांना ताब्यात घेतले. तर भैय्या सोनावणे (रा. कांचन नगर, जळगाव) हा मुख्य पुरवठादार अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
३ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपींकडून ₹२,८२,५४० किमतीचे एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि अन्य साहित्य असा एकूण ₹३,०६,५४० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती
तपासादरम्यान अटक करण्यात आलेले आरोपी हे फरार आरोपी भैय्या सोनावणे याच्याकडून प्रति ग्रॅम सुमारे ₹२,००० दराने एमडी ड्रग्ज खरेदी करून ते पुढे ग्राहकांना ₹२,५०० प्रति ग्रॅम दराने विकत असल्याची माहिती उघड झाली आहे. मुख्य आरोपी जयेष तायडे हा स्वतःही या अमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास एलसीबी व जिल्हापेठ पोलीस संयुक्तपणे करत आहेत.






















