जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) शहरातील वाढत्या वाहतूक अपघातांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जळगाव शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास परवानगी देणाऱ्या ४८ पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व अंमलदारांच्या विशेष पथकांनी शहरातील प्रमुख चौक, शाळा-महाविद्यालय परिसर तसेच गर्दीच्या ठिकाणी तपासणी मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान अल्पवयीन मुलांकडून चालविण्यात येणारी अनेक वाहने ताब्यात घेण्यात आली. संबंधित मुलांच्या पालकांना वाहतूक शाखेच्या कार्यालयात बोलावून मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्याबाबत समुपदेशन करण्यात आले.
याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात आली. ट्रिपल सीट, सिग्नल तोडणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे अशा विविध प्रकारांमध्ये अनेक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
कारवाईचा तपशील
अल्पवयीन वाहनचालक: ४८ प्रकरणे – ₹२.४० लाख दंड
ट्रिपल सीट: २० प्रकरणे – ₹२०,००० दंड
सिग्नल तोडणे: ३७ प्रकरणे – ₹३,५०० दंड
मोबाईलवर बोलत वाहन चालविणे: १२ प्रकरणे – ₹४,००० दंड
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अशी कारवाई पुढील काळातही सुरू राहणार असून पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नये, असे आवाहन जळगाव शहर वाहतूक शाखेने केले आहे.






















