दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम मागणी दौंड नगरपरिषदेतील नगरसेवकांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पुणे यांना हरकत अर्ज व सूचना सादर करण्यात आल्या असून, या अर्जावर दौंड नगरपरिषदेतील १६ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गटनेते योगेश प्रेमसुख कटारिया यांच्या पुढाकाराने सादर करण्यात आलेल्या निवेदनात दौंड तालुक्याचे भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीयदृष्ट्या पुण्याशी असलेले निकटचे संबंध अधोरेखित करण्यात आले आहेत. दौंड हे महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून, पुण्याशी दळणवळणाची उत्तम सुविधा असल्यामुळे नागरिकांची बहुतांश शासकीय कामे पुण्यातच सुलभपणे होतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, दौंड तालुक्यातील नागरिक, व्यापारी, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि नोकरदार यांचे दैनंदिन व्यवहार, शिक्षण, रोजगार व उद्योगधंदे पुण्याशी जोडलेले असल्याने बारामतीशी संलग्न केल्यास नागरिकांना अतिरिक्त आर्थिक व वेळेचा भुर्दंड सहन करावा लागेल, असा मुद्दाही नगरसेवकांनी मांडला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, रेल्वे, एसआरपी, पोलीस प्रशिक्षण केंद्र तसेच इतर अनेक शासकीय कार्यालयांमुळे दौंडचा प्रशासकीय संबंध पुण्याशी अधिक दृढ आहे. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा कार्यक्षेत्र निश्चित करताना नागरिकांची सोय, भौगोलिक परिस्थिती आणि प्रशासकीय सुसंगती लक्षात घेऊन दौंड तालुका पुण्याशीच संलग्न ठेवावा.
याशिवाय, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक दृष्ट्याही दौंडचे पुण्याशी घट्ट नाते असल्याचे नमूद करत, प्रशासनाने नागरिकांच्या भावना व अडचणींचा विचार करून प्रस्तावित निर्णयात योग्य बदल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर गटनेते योगेश प्रेमसुख कटारिया,उपाध्यक्ष छाया दीपक थोरात यांच्यासह दौंड नगरपरिषदेतील एकूण १६ नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या करून दौंडकरांच्या वतीने एकमुखी भूमिका मांडली आहे.






















