निफाड:( प्रतिनिधी योगोश कर्डीले) निफाड तालुक्याच्या राजकीय इतिहासात आज सुवर्णाक्षराने नोंद होणारी घटना घडली. निफाड नगरपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच एससी वर्गातून बौद्ध समाजातील महिला लोकप्रतिनिधी *माननीय अरुंधतीताई पवार* यांची नगराध्यक्षपदी निवड झाली.
या निवडीमुळे निफाड शहरासह संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. सामाजिक न्याय आणि प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अरुंधतीताई पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी निफाड शहरातील विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी *माननीय अशोक भाई पठाण, नितीन काका खडताळे, निर्भयणे मामा, विकास भाऊ जगताप, सिद्धार्थ बापू खडताळे, बाळासाहेब पगारे, चंद्रमानी पवार* यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना अरुंधतीताई पवार म्हणाल्या, “माझ्यावर विश्वास दाखवून दिलेल्या सर्व नागरिकांचे आणि सहकारी कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानते. निफाड शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि महिला व तरुणांच्या विकासासाठी प्राधान्याने काम करेन. सर्व समाजाला सोबत घेऊन पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार करणे हेच माझे ध्येय आहे.”
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अरुंधतीताई पवार यांच्या निवडीमुळे महिला सक्षमीकरणाला आणि वंचित घटकांना नवे बळ मिळाले आहे, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
नगरपंचायतीच्या सर्व सदस्यांसोबत समन्वय ठेवून निफाडला आदर्श शहर बनवण्याचा संकल्प यावेळी सर्व उपस्थितांनी केला.






















