वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) महाराणा प्रताप चौकात रंगेहात कारवाई; सात बॉण्डसाठी ₹140 जादा वसूल करताना छापा, मुद्देमाल जप्त; गुन्हा दाखल
शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे आकारून बॉण्डची विक्री करणाऱ्या महाराणा प्रताप चौक (बजाजनगर) येथील महिला बॉण्ड विक्रेतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी सकाळी धडक कारवाई केली. ₹100 किमतीचा बॉण्ड ₹120 ला विकत सात बॉण्डसाठी एकूण ₹140 जादा रक्कम स्वीकारताना शीला शशीकांत बोऱ्हाडे (वय 48, रा. महाराणा प्रताप चौक, बजाजनगर, एमआयडीसी वाळूज) हिला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी तिच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, एका सामाजिक कार्यकर्तीला संस्थेच्या नोंदणीसाठी सात कोरे बॉण्ड खरेदी करायचे होते. गुरुवारी (9 जुलै) बॉण्ड खरेदीसाठी गेल्यानंतर प्रत्येक ₹100 च्या बॉण्डमागे ₹20 अतिरिक्त देण्याची मागणी करण्यात आली. तक्रारदार महिलेने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर शुक्रवारी (10 जुलै) सकाळी सापळा रचण्यात आला. आरोपीने सात बॉण्डसाठी ₹140 जादा रक्कम स्वीकारताच तक्रारदाराने पूर्वनियोजित संकेत दिला आणि एसीबीच्या पथकाने तत्काळ धाड टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान जादा वसूल केलेली रोकड, बॉण्ड व अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपी महिलेला पुढील कारवाईसाठी वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
२५ वर्षांपासून सुरू असल्याची चर्चा
महाराणा प्रताप चौक परिसरात बॉण्ड विक्री व नोटरीच्या नावाखाली अनेक वर्षांपासून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे आकारले जात असल्याची चर्चा आहे. शालेय विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांकडून अतिरिक्त रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी वारंवार होत असून, इतक्या वर्षांनंतर झालेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दबाव टाकण्याचा प्रयत्न फसला
कारवाईदरम्यान संशयित महिलेचे पती शशीकांत बोऱ्हाडे यांनी स्वतःला एका दैनिकाचे संचालक असल्याचे सांगत अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र एसीबीच्या अधिकाऱ्यांनी कोणताही दबाव न स्वीकारता नियमानुसार कारवाई सुरू ठेवली.
पाहुण्यामुळे उघडला दरवाजा
आरोपीकडील व्यवहार घराचा दरवाजा बंद ठेवून खिडकीतून होत असल्याने पुरावे नष्ट होण्याची शक्यता होती. त्यामुळे एसीबीने स्थानिक पोलिसांची मदत घेत नियोजन केले. तक्रारदाराने संकेत दिल्यानंतर अधिकारी घराजवळ पोहोचले. त्याचवेळी घरातील एक पाहुणा बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडताच अधिकाऱ्यांनी तत्काळ घरात प्रवेश करून आरोपीला रंगेहात पकडले.
नागरिकांना आवाहन : शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे आकारले जात असल्यास संबंधित यंत्रणेकडे तातडीने तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






















