विष्णू गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) : गेवराई तालुक्यातील विविध पांडुरंग देवस्थानाच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त ९ ते १६ मार्च दरम्यान श्रीमद भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण व हरिकीर्तनाचे विविध आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कथा सोहळ्याच्या पाचव्या दिवशी भागवताचार्य हभप प्रल्हाद महाराज येवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या वेळी धर्माची ग्लानी होते आणि अधर्म वाढतो, त्या वेळी परमात्मा विविध रूपात अवतार घेऊन भक्तांचे रक्षण व दुर्जनांचा नाश करतो. भगवान श्रीकृष्णांचे जीवन आणि विचार हे मानवजातीसाठी मार्गदर्शक आहेत. त्यांच्या दिव्य विचारांचे आचरण केल्यास मनुष्याचे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि आनंदी होऊ शकते.
तसेच त्यांनी सत्यकर्म, नामस्मरण आणि सात्विक विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. मनुष्य आपल्या कर्मांमुळेच देवत्व प्राप्त करतो किंवा त्यापासून दूर जातो. त्यामुळे प्रत्येकाने सत्यकर्माचा मार्ग स्वीकारून जीवनात चांगले विचार आणि संस्कार जोपासावेत, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी मुलांच्या घडणीत आईच्या संस्कारांचे महत्त्वही स्पष्ट केले. आई ही मुलांना घडवणारी मोठी शक्ती असून तिच्या संस्कारांमुळेच महान व्यक्तिमत्त्वांची निर्मिती होते. राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले, असे सांगत प्रत्येक घरात जिजाऊंसारख्या मातांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोहळ्यात पहाटे रामधून, काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी श्रीमद भागवत कथा आणि सायंकाळी हरिपाठ व हरिकीर्तन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. या आध्यात्मिक कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून गेवराई तालुक्यातील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.






















