दौंडमध्ये गुटखा विक्रीला खुलेआम उधाण यापूर्वीही कारवाई फक्त टपऱ्यांपुरतीच मर्यादित, होलसेल व फेरीवाले मोकळे

दौंडमध्ये गुटखा विक्रीला खुलेआम उधाण यापूर्वीही कारवाई फक्त टपऱ्यांपुरतीच मर्यादित, होलसेल व फेरीवाले मोकळे

संघराज गायकवाड (दौंड प्रतिनिधी) : दौंड शहरात शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री सर्रास सुरू असून याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शहरातील चौकाचौकात असलेल्या टपऱ्यांवर खुलेआम गुटखा विकला जात असून अल्पवयीन मुलांपर्यंत हा अपायकारक पदार्थ सहज पोहोचत आहे.

यासोबतच शहरातील गल्लीबोळ व वस्त्यांमध्ये फिरून विक्री करणारे फेरीवाले देखील मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री करत असल्याचे वास्तव समोर येत आहे. हातगाडी, सायकल किंवा पिशवीतून विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे बंदी असलेला गुटखा थेट घराघरात पोहोचत असून त्यांच्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातील अनेक टपरीवाले रोजच्या उदरनिर्वाहासाठी गुटख्याची विक्री करत असल्याचे वास्तव असले तरी, याआधीही वेळोवेळी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये बहुतांशी केवळ टपऱ्यांवरच कारवाई करण्यात आली असून, फेरीवाले आणि होलसेल विक्रेते मात्र कायमच कारवाईपासून दूर राहिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या संपूर्ण अवैध साखळीचा खरा कणा म्हणजे दौंडमधील काही ठराविक होलसेल विक्रेते व मोठ्या प्रमाणावर साठा करणारे व्यापारी असल्याची चर्चा आहे. हेच होलसेल विक्रेते टपरीवाले व फेरीवाले यांना मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा पुरवठा करत असल्याचे सांगितले जात आहे.

या आधीही अनेक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी दौंड शहरात सुरू असलेल्या गुटखा विक्रीबाबत वारंवार तक्रारी नोंदवल्या आहेत. त्या तक्रारीनंतर केवळ एक-दोन दिवस कारवाई होत असल्याचे दिसते. मात्र त्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असून टपरीवाले, फेरीवाले व होलसेल विक्रेते पुन्हा खुलेआम गुटखा विक्री सुरू करत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून एक महत्त्वाचा व संतुलित मुद्दा मांडण्यात येत आहे की, हा प्रश्न व्यक्तीविरोधी नसून संपूर्ण व्यवस्थेविरोधी आहे. किरकोळ टपरीवाल्यांवरच कारवाई करून विषय संपवण्याऐवजी, गुटख्याचा मोठ्या प्रमाणावर साठा करणारे, होलसेल विक्रेते, गोडाऊन चालक व पुरवठा साखळी चालवणारे मुख्य सूत्रधार यांच्यावर आधी आणि ठोस कारवाई व्हावी, अशी ठाम मागणी नागरिक करत आहेत.

आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असलेल्या गुटख्यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या विळख्यात अडकत असून शासनाच्या स्पष्ट बंदीनंतरही दौंडमध्ये गुटख्याचा साठा, वाहतूक व विक्री सुरू असणे ही गंभीर बाब मानली जात आहे.

दौंड पोलीस व अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संयुक्त मोहीम राबवून टपरीवाले, फेरीवाले व होलसेल विक्रेते यांच्यावर एकाचवेळी कारवाई करावी, मात्र कारवाईचा मुख्य फोकस मोठ्या पुरवठादारांवर असावा, अशी अपेक्षा आता दौंडकर नागरिक व्यक्त करत आहेत.