विनोद पवार ( जळगाव प्रतिनिधी ) : मुंबई – नाशिक–त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे शिखर समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विकासकामांना गती देण्यावर भर देण्यात आला.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, निवास व्यवस्था आणि सुरक्षेसाठी एकूण 22 हजार 181 कोटी रुपयांच्या कामांना बैठकीत मंजुरी देण्यात आली. या कामांमुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील विकासाला चालना मिळणार असून भाविकांसाठी अधिक सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.
बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून लाखो-कोट्यवधी भाविक येतात. त्यामुळे या सोहळ्याचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध आणि भव्य स्वरूपात करण्यात यावे. कुंभमेळ्यात सहभागी होणारा प्रत्येक भाविक महाराष्ट्राबद्दल चांगला अनुभव घेऊन जाईल, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच कुंभमेळ्यासंदर्भातील कामांमध्ये जाणूनबुजून अडथळे निर्माण करणाऱ्या किंवा विलंब घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, नाशिक जिल्ह्यातील विधिमंडळ सदस्य तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.






















