सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) : सिन्नर शहरातील पसरट गल्ली परिसरात मोटारसायकल पार्किंगच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २९ मार्च २०२६) रात्री घडली. या प्रकरणातील आरोपीला सिन्नर पोलिसांनी तत्परतेने अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राकेश दशरथ जाधव (वय ३६) आणि गौरव दशरथ जाधव (वय ३९) हे दोघे भाऊ आपल्या घराजवळ मोटारसायकल पार्किंगवरून शेजारी राहणारे भाऊबंध बंडू अशोक जाधव (वय ४२) यांच्याशी वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता बंडू जाधव याने जवळील धारदार शस्त्राने राकेश आणि गौरव जाधव यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
जखमींना तात्काळ सिन्नर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. यातील गौरव दशरथ जाधव यांना जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक येथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर जखमी राकेश जाधव यांच्यावर श्रीजी हॉस्पिटल, नाशिक येथे उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांनी तत्काळ पथक तयार करून तपास सुरू केला. श्रीजी हॉस्पिटल येथे जाऊन जखमी राकेश जाधव यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानुसार संशयित आरोपी बंडू अशोक जाधव याच्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २०७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०३(१), १०९(१), ३५२ अन्वये खून व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला .
घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली. सिन्नर पोलिसांनी जलद हालचाल करत आरोपी बंडू अशोक जाधव यास अल्पावधीतच अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कांतिलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पो.उपनिरीक्षक रमेश पाटील, संजय गोसावी तसेच पोलीस कर्मचारी नवनाथ पवार, सदानंद बोराडे, रविंद्र गवांडी, नितीन डावखर, गणेश वराडे, हर्ष आव्हाड, मनीष मानकर, राहुल इंगोले, विलास बिडगर, भारत पवार, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, साईनाथ नागरे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे, विष्णू तवार, महेंद्र खामकर आदींचा सहभाग होता.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पो.उपनिरीक्षक रमेश पाटील करत आहेत.






















