Times Of Maharashtra: मुंबई महापालिका निवडणुकीत स्पष्ट यश मिळाल्यानंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील सत्तावाटपाबाबतच्या अंतिम वाटाघाटी जवळपास पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेतील महत्त्वाच्या पदांवर कोणाचा दावा असणार, यावर दोन्ही पक्षांमध्ये सध्या निर्णायक चर्चा सुरू आहे.
शिवसेनेचा महापौर व्हावा : शिवसेनेची मागणी
शिवसेना शिंदे गटाकडून भाजपकडे महापौरपद किंवा स्थायी समिती अध्यक्षपदाची मागणी करण्यात येत आहे. तर महत्त्वाच्या समित्यांपैकी सुधार समिती किंवा शिक्षण समिती शिवसेनेकडे द्यावी, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत महापौरपद भाजपकडे राहिल्यास, त्या बदल्यात शिवसेना शिंदे गटाला स्थायी समिती अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजप सुधार समिती, बेस्ट आणि आरोग्य समिती स्वतःकडे ठेवण्याच्या तयारीत असल्याचे समजते. त्याबदल्यात शिवसेनेला शिक्षण, विधी, बाजार आणि उद्यान समित्यांचे नेतृत्व दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
दिल्लीश्वरांचा सबुरीने घेण्याचा विचार
राज्यातील स्थिर सरकार लक्षात घेता, युतीत कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी भाजपकडून शिवसेनेला सन्मानाने पदे देण्याची भूमिका घेतली जात आहे. दिल्लीतील भाजप-शिवसेना नेत्यांच्या बैठकीनंतर आता लवकरच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अंतिम बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईसह कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगर या चार महापालिकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
पण महापौर भाजपचाच
दरम्यान, 30 जानेवारी रोजी मुंबई महापालिकेचा महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. शिवसेनेच्या दबावतंत्राला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट करत, 30 जानेवारीला भाजपचाच महापौर निवडून येईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.






















