गेवराई तालुका (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : ठेवीदार कलेक्टर व एसपी कार्यालयात धडकले गेवराई, दि.१८(प्रतिनिधी )_ १६ एप्रिल रोजी गेवराई येथील विविध क्रेडिट सोसायटी व पतसंस्थांचे ठेवीदार बीड येथे पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी बीड यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेऊन निवेदन दिले. निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करण्याचे शिष्टमंडळास आश्वासन दिले.
पोलिस अधीक्षक कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखांमध्ये तपास अधिकारी भागिले यांच्याकडे छञपती मल्टीस्टेट विरोधात सर्वांनी तक्रार दाखल केली. यावेळी ठेवीदारांची एकजूट दिसून आली. यावेळी शेकडो ठेवीदार सहभागी झाले होते. दरम्यान संघर्षयोद्धा सचिन उबाळे पाटील यांनी संचेती हॉस्पिटल येथून मोबाईलद्वारे संपर्क करून आगे बढो असे सांगितले. पतसंस्था, क्रेडिट सोसायटी, मल्टीस्टेट, अर्बन मल्टिपल अर्बन निधी अशा क्रेडिट सोसायटीमध्ये अधिक व्याजदराचे आमिष दाखवून क्रेडिट सोसायटी चालक यांनी ठेवीदारकडून रक्कम गुंतवणूक करून घेतली आहे. रक्कम मागितली असता देण्यास टाळाटाळ करीत आहेत. ठेवीदारांची उपासमार सुरू झाली आहे.

ठेवीदार यांनी पुढील मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा ,अशी मागणीही ठेवीदारांनी केली. मागण्या:१) फसवणूक करणाऱ्या क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन, संचालक मंडळ यांच्यावर एमपीआयडी अंतर्गत कारवाई करावी.२) सोसायटीचे चेअरमन, संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर कारवाई करावी.३) फॉरेन्सिक ऑडिट करावे.४) फरार असलेल्या छत्रपती मल्टीस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी, त्यांचे संचालक व श्री मंगलनाथ अर्बन मल्टिपल अर्बन निधी लिमिटेड चे चेअरमन केशव पंडित व संचालक मंडळावर तसेच कर्मचारी यांना त्वरीत अटक करावी.५) संबंधितांच्या मालमत्ता लिलाव करून आम्ही गुंतवलेले रक्कम आदी आम्हाला परत मिळावी.
गेवराई येथील फसवणूक केलेल्या क्रेडिट सोसायटीमध्ये छत्रपती मल्टीस्टेट, साईराम, मा जिजाऊ, मंगलनाथ, शुभकल्याण, राजस्थानी,परिवर्तन, ढोकेश्वर,श्रीमंतयोगी आदी क्रेडिट सोसायटी, मल्टीस्टेट, मल्टिपलअर्बन पतसंस्था यामध्ये ठेवीदारांची रक्कम गुंतली आहे. ठेवीदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे गेवराई तालुका ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.






















