जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :
जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७ हजार कर्मचारी, प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, ते घराघरांत जाऊन माहिती संकलित करणार आहेत. नागरिकांनी जनगणनेदरम्यान अचूक व खरी माहिती देणे बंधनकारक असून, जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
जनगणना ही दोन टप्प्यांत पार पडणार असून, पहिल्या टप्प्यात घर व मालमत्तेशी संबंधित माहिती गोळा केली जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात कुटुंबातील सदस्यांची संख्या, शिक्षण, व्यवसाय, उत्पन्न तसेच घरातील सुविधा यांची सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. यामध्ये पाणी, वीज, शौचालय, गॅस, मोबाईल, वाहन, टीव्ही यांसारख्या मूलभूत व आधुनिक सुविधांची नोंद केली जाणार आहे.
यंदा नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने स्व-गणना करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती भरू शकतात, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी व जलद होणार आहे. त्यानंतर प्रगणकांकडून त्या माहितीची पडताळणी केली जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, जनगणना ही देशाच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, शासनाच्या विविध योजना आणि धोरणे तयार करण्यासाठी यातील माहितीचा उपयोग होतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहभाग नोंदवून योग्य व सत्य माहिती द्यावी.
जनगणनेतून मिळणाऱ्या अचूक आकडेवारीमुळे भविष्यातील विकास आराखडे, सुविधा आणि शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांचे सहकार्य हे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






















