गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गोदाकाठच्या अनेक गावांमधून दररोज शेकडो हायवा आणि ट्रक वाळूची वाहतूक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या अनियंत्रित वाळू उपशामुळे गोदावरी नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात पोखरले जात असून अनेक ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे नदीच्या पर्यावरणीय संतुलनावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, अवैध वाळू उपशाचा प्रश्न अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला असला तरी ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे संबंधित महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही नागरिकांनी तहसीलदारांवर गंभीर आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
राक्षसभुवन परिसरात दररोज दशक्रिया विधीसाठी हजारो नागरिक येत असतात. अशा धार्मिक आणि संवेदनशील ठिकाणांच्या आसपासही वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विधीसाठी येणाऱ्या कुटुंबांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय भरधाव वेगाने धावणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
वाळू उपशामुळे तयार झालेल्या खोल खड्ड्यांमध्ये यापूर्वी काही दुर्दैवी घटना घडल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. तसेच शासनाचा महसूल बुडत असल्याचाही आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. “गोदावरी वाचवा, अवैध वाळू उपसा थांबवा” हा आवाज आता जनतेच्या आंदोलनाचे रूप घेत असल्याचे चित्र गेवराई तालुक्यात दिसून येत आहे.






















