जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीमुळे कंपनीच्या इमारतीतून धुराचे मोठे लोट आणि उंच ज्वाळा उसळताना दिसत होत्या. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविले.
माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला दोन ते तीन अग्निशमन बंबांच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने अतिरिक्त मदत मागविण्यात आली. त्यानंतर सहा ते सात अग्निशमन बंब आणि अनेक जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अखेर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले.
आगीची तीव्रता मोठी असली तरी अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग शेजारील इतर युनिटमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. मात्र, या आगीत कंपनीतील कच्चा माल, तयार माल, यंत्रसामग्री आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा अंतिम आकडा संबंधित यंत्रणांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
या बचाव मोहिमेत वाहनचालक युसुफ पटेल, मयूर ओतारी, गोपाल तडवी तसेच फायरमन योगेश कोल्हे, रोकेश सोनवणे, इकबाल तडवी, राकेश पाटील, विक्की सोनवणे आणि सतार तडवी यांनी जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
दरम्यान, या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात येत असून, आग लागण्यामागील कारणांचा आणि झालेल्या नुकसानीचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.






















