ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) ब्रह्मपुरी शहरातील देलनवाडी वॉर्डात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चार दिवसांपूर्वी या भागातील रहिवासी बावनकुळे यांच्या घराच्या वॉल कंपाउंडमध्ये घुसून बिबट्याने पाळीव कुत्र्याची शिकार केली होती. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली होती.
घटनेची गांभीर्य ओळखून वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांनी तातडीने देलनवाडी परिसरात वनविभागाची गस्त वाढवली. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात विशेष ट्रॅप कॅमेरेही बसवण्यात आले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास बावनकुळे यांना त्यांच्या परिसरात पुन्हा बिबट्या आल्याचा भास झाला. त्यांनी तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांना फोन करून याची माहिती दिली. कन्नमवार यांनी तात्काळ वनरक्षक चुन्ने यांना घटनास्थळी पाठवून ट्रॅप कॅमेरे तपासण्याचे आदेश दिले.
वनरक्षक चुन्ने यांनी कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता, त्यात बिबट्या नसून ‘जंगल कॅट’ रानमांजर असल्याचे निष्पन्न झाले. वनविभागाने या जंगल कॅटचे फोटो बावनकुळे आणि परिसरातील नागरिकांना दाखवून त्यांची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला.
परिसरात जंगल कॅट दिसली असली, तरी बिबट्याने पाळीव प्राण्याची शिकार केल्यामुळे त्याचा वावर पूर्णपणे नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर ब्रह्मपुरी अरुप कन्नमवार यांनी केले आहे.






















