वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज पोलीस ठाण्याच्या पथकाने वाळूज परिसरातील तीन पानटपऱ्यांवर एकाच वेळी धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा एकूण ₹५,६२४ किमतीचा साठा जप्त केला. ही कारवाई उपनिरीक्षक रेशीम कोळेकर व विजय पिंपळे यांच्या पथकाने इसारवाडी फाटा, लिंबे जळगाव आणि वाळूज परिसरात केली.
इसारवाडी फाटा येथील गोविंदा पान सेंटरमधून ₹१,३३८, लिंबे जळगाव येथील पान शॉपमधून ₹१,५१८, तर वाळूज येथील मनीषा पान सेंटरमधून ₹२,७६८ किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. एका ठिकाणी संशयित व्यक्ती पोलिसांना पाहून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम अंतर्गत वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असताना त्याची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात अशी कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.






















