भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): भंडारा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयात लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती तसेच जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन विविध जनजागृतीपर कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
भगतसिंग वार्ड, नवीन टाकळी येथील समितीच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता आयोजित कार्यक्रमात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी कार्याची माहिती देण्यात आली. विशेषतः मुलांना त्यांच्या जीवनकार्याचे महत्त्व पटवून देत सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.
तसेच जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त व्यसनामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना सोनपापडी वाटप करून “गोड गोड बोला, व्यसनमुक्त राहा” असा सामाजिक संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुवाबाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, ॲड. रॉयल लोणारे, मानव लोणारे, विहान देशकर, प्रतीक राऊत, श्री. भोयर, भावेश कांबळी, उमंग कांबळी, अवनी लोणारे, विहान लोणारे, सौ. कविता लोणारे, सौ. रूपाली लोणारे तसेच समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.






















