गेवराई(प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : मानवी शरीरातील मूत्रपिंड (किडनी) हे आकाराने लहान असले तरी
शरीरातील घातक द्रव्ये गाळून टाकणे, रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम किडनी करते. त्यामुळे शरीरातील किडनी निरोगी असेल तर आयुष्य निरोगी जगता येते. त्यामुळे चुकीच्या सवयी, व्यसने सोडून किडनीचे आरोग्य जपण्याचा सल्ला किडनीरोगतज्ज्ञ देतात. दरवर्षी १२ मार्च रोजी ‘जागतिक किडनी दिन’ साजरा केला जातो. २०२६ साठी ‘किडनी हेल्थ फॉर ऑल केअरिंग फॉर पीपल, प्रोटेक्टिंग द प्लॅनेट’ ही संकल्पना जाहीर करण्यात आली आहे.
किडनी आजारांचे धोके
मूत्रपिंडांचे आजार अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणे दाखवत नाहीत. त्यामुळे त्यांना ‘सायलेंट किलर’ असेही म्हटले जाते. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्थूलता तसेच कुटुंबात किडनी आजारांचा इतिहास असलेल्या व्यक्तींना किडनी आजाराचा धोका अधिक असतो.
चुकीची जीवनशैली यामुळे किडनी आजार वाढत आहे. त्यामुळे नियमित तपासणी, दररोज पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, व्यायाम आणि कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय न घेणे, यामुळे किडनीचे आरोग्य टिकवता येते असे विचार जागतिक किडनी दिनाचे औचित्य साधून –डॉ. शशिकांत मुळे जनरल फिजिशन गढी तालुका गेवराई जिल्हा बीड यांनी मांडले






















