पुणे वन विभागाची मोठी कारवाई ; २ कोटींचा अंबरग्रीस मुद्देमाल जप्त – तिघांना अटक, एक फरार
पुणे :- पुणे वनविभागाच्या पथकाने कोथरूड–चांदणी चौक परिसरात सापळा रचून तब्बल २ कोटी रुपये किंमतीचा स्पर्म व्हेल माश्याची उलटी (अंबरग्रीस) जप्त केली. या कारवाईत तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
वनविभागाला २१ ऑगस्ट रोजी तस्करांकडे अंबरग्रीस असल्याची माहिती मिळाली होती. वनसंरक्षक पुणे आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते व विभागीय वनअधिकारी (भूमी व कॅम्पा) अमोल थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक वनसंरक्षक विशाल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले, ऋषिकेश चव्हाण व इतर अधिकारी-कर्मचारी यांनी पथक तयार करून संशयितांना सायंकाळी ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्याकडून साधारण दोन किलो अंबरग्रीस आणि एक इनोव्हा कार जप्त करण्यात आली.
अंबरग्रीस बाळगणे व तस्करी करणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार गंभीर गुन्हा आहे. या प्रकरणी कलम २(३२), ९, ३९, ४४, ४८(अ), ४९, ५० व ५१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक आरोपींना प्रथम ३ दिवसांची वन कोठडी सुनावली होती. कोठडीचा कालावधी संपल्यानंतर २४ ऑगस्ट रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त ३ दिवसांची वन कोठडी देण्यात आली.
स्पर्म व्हेल हा अनुसूची-१ मधील संरक्षित व दुर्मिळ प्राणी असून त्याची उलटी परफ्युम उद्योगात टिकाऊ सुगंधासाठी वापरली जाते. प्राथमिक तपासात या तस्करीचे जाळे विस्तृत असल्याचे समोर आले असून आणखी व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास सुरू आहे.






















