Times of Maharashtra Desk, Pune: स्मार्ट सिटीप्रकल्पात समावेश असूनही पुणे महापालिकेच्या प्रभाग क्र. ८ औंध-बोपोडी परिसरातील नागरिकांना आजही अनेक मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. पाणी, कचरा, ड्रेनेज, रस्ते आणि वाहतूक कोंडीसारख्या अडचणींनी येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामे आणि वाढत्या अतिक्रमणामुळे रहदारीच्या समस्या वाढत आहेत.
वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्ते
२०१७ मध्ये भाजपने हाती घेतलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत परिहार चौक ते ब्रेमेन चौक आणि परिहार चौक ते आंबेडकर चौक यादरम्यानचा रस्ता विकसित करण्यात आला. मात्र, भविष्यातील वाहतुकीचा विचार न करता हा प्रकल्प राबवल्याने समस्या वाढल्या आहेत. विदेशी संकल्पनेनुसार या रस्त्यांवर पदपथ मोठे केल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झाला असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तसेच, रस्त्यांवर पार्किंग व्यवस्थेचा अभाव असल्याने कोंडीत भर पडत आहे. बाणेर-औंध हद्दीवरील रस्त्याचे रुंदीकरण तसेच भाले चौकातील वेस्टन मॉलसमोरील रस्त्याचे रुंदीकरण गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. या भागात अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
इतर प्रमुख नागरी समस्या
परिसरातील ड्रेनेज व्यवस्थेची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. बंधनगड परिसरात कचऱ्याची समस्या आजही कायम आहे. औंध येथील जलतरण तलाव देखभाल व दुरुस्तीचा अभावाने गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे. एस. आर. ए. प्रकल्पांतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन योजना रखडल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. संजय गांधी मॅटर्निटी हॉस्पिटलची नवीन इमारत अद्यापही बंद आहे. हॉकी स्टेडियमचे काम अर्धवट अवस्थेत आहे. बोपोडी मेट्रो स्टेशन परिसरात पार्किंग व्यवस्थेचा अभाव आहे.
वाढते अतिक्रमण आणि प्रशासकराज
औंध परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढले असून, परिसरातील पदपथांवर अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहेत. रस्ते आणि पदपथांवर अनधिकृत स्टॉल थाटल्याचे चित्र आहे. कोरोनानंतर महापालिकेत प्रशासकराज आल्यामुळे विकासकामे ठप्प झाली असून, कोणाचेही नियंत्रण नसल्याने प्रशासनाचे नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक व माजी लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे.
भाजपचा गड ढासळणार?
या प्रभागमध्ये भाजपला स्वतःच्याच पक्षातील बंडखोरीचे मोठे ग्रहण लागले आहे. एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या प्रभागात आता बंडखोर विरुद्ध पक्षनिष्ठ असा सामना रंगला असून, यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नेमका वाद काय?
या प्रभागात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने या प्रभागातील चारही जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदा उमेदवारी वाटपावरून पक्षात मोठी नाराजी उफाळून आली आहे.
भाजपमधील काही विद्यमान नगरसेवक आणि नवीन इच्छुक उमेदवार यांच्यात तिकिटावरून रस्सीखेच सुरू झाली. पक्षाने काही निष्ठावंतांना डावलल्याने त्यांनी बंडखोरीचा झेंडा फडकवला आहे.
या प्रभागात अर्चना मुसळे आणि त्यांचे पती मधुकर मुसळे यांचे मोठे वर्चस्व आहे. मात्र, पक्षांतर्गत मतभेद आणि स्थानिक समीकरणे बदलल्यामुळे मुसळे गटाने घेतलेली भूमिका भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. या बंडखोरीमुळे भाजपची हक्काची मते विभागली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रभागातील दिग्गज नेते प्रकाश धोरे यांच्या समर्थकांमध्येही अस्वस्थता आहे. तिकिटासाठी झालेली ही अंतर्गत लढाई आता चव्हाट्यावर आली असून, त्याचा थेट फटका निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो.
बंडखोरीचे परिणाम?
बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्यास भाजपच्या हक्काच्या व्होट बँकला सुरुंग लागेल. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांना होण्याची शक्यता आहे.
पक्षाचा अधिकृत उमेदवार आणि बंडखोर उमेदवार, जे पूर्वाश्रमीचे भाजप नेतेच आहेत यांच्यात प्रचार करताना स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली आहे.
आधीच औंध आणि बोपोडी परिसरातील नागरिक पाणी, रस्ते आणि वाहतूक कोंडी या समस्यांमुळे संतापलेले आहेत. त्यातच राजकीय अस्थिरतेमुळे मतदारांचा कल बदलू शकतो.
औंध-बोपोडीतील ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर न होता, आता प्रतिष्ठा आणि बंडखोरी याभोवती केंद्रित झाली आहे. भाजप आपल बंड थोपवणार की हा बालेकिल्ला गमावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






















