तुषार शेटे(प्रतिनिधी,शिरपूर, धुळे) : शिरपूर शहराच्या वैद्यकीय इतिहासात पहिल्यांदाच ट्रिप्लेट (तीन बाळे) असलेल्या गर्भधारणेची नॉर्मल (सामान्य) प्रसूती यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे. ही दुर्मिळ आणि उच्च जोखमीची प्रसूती आदिशक्ती मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल येथे सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व गोल्ड मेडलिस्ट डॉ. दिलबर पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सदर गर्भधारणा अत्यंत जटिल स्वरूपाची असल्याने जवळपास दोन महिन्यांपासून आई आणि बाळांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. नियमित तपासण्या, योग्य औषधोपचार, सातत्यपूर्ण फॉलोअप आणि वेळोवेळी घेतलेले वैद्यकीय निर्णय यामुळे ही प्रसूती सुरक्षितपणे पार पडली.
राम नवमीच्या पवित्र दिवशी या तिन्ही बाळांचा जन्म सुरक्षितपणे झाल्याने हा क्षण अधिकच आनंददायी ठरला. सध्या आई आणि तिन्ही नवजात बाळांची प्रकृती उत्तम असून ते पूर्णपणे सुरक्षित आहेत.
या यशस्वी घटनेमुळे योग्य वैद्यकीय सेवा, अनुभवी डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि सततची काळजी यामुळे कितीही अवघड परिस्थितीवर मात करता येते, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.






















