निफाड (प्रतिनीधी उत्तम जाधव नाशिक योगेश कर्डीले): दूध व्यवसायात सध्या एका नव्या आदेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या धडक निर्णयामुळे निफाड तालुक्यातील दूध संकलन केंद्रचालकांचे धाबे दणाणले आहेत.
मुंढे यांनी प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून, हे अधिकारी कोणत्याही वेळी अचानक दूध डेअरी व संकलन केंद्रांवर भेट देऊन तपासणी करणार आहेत. यामुळे निफाड तालुक्यातील दूध संकलन केंद्रांवर सध्या कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहेत नवे निर्देश?
शासनाने निश्चित केलेल्या दर्जापेक्षा कमी प्रतीचे दूध स्वीकारू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. चर्चेनुसार, 3.3% फॅट व 8.3% SNF पेक्षा कमी दर्जाचे दूध संकलन केंद्रांनी घेऊ नये.
चालकांची वाढली धाकधूक
या आदेशानंतर अनेक दूध संकलन केंद्रांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. कमी गुणवत्तेचे दूध आढळल्यास संबंधित केंद्रचालकाला थेट अधिकाऱ्यांसमोर जाब द्यावा लागणार असल्याची चर्चा आहे. दुधात पाणी किंवा अन्य कोणतीही भेसळ आढळल्यास थेट कारवाई अटळ असल्याने अनेकांची झोप उडाली आहे.
‘गुणवत्ता प्रथम’ हाच मंत्र
निफाड तालुक्यातील शेतकरी व ग्राहकांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे. “आता दूध व्यवसायात गुणवत्ता प्रथम हाच मंत्र महत्त्वाचा ठरणार” अशी भावना व्यक्त होत आहे. अचानक तपासणीच्या धास्तीमुळे भेसळ करणाऱ्यांवर वचक बसणार असून, ग्राहकांना शुद्ध दूध मिळण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, निफाड तालुक्यातील सर्व दूध संकलन केंद्रांनी फॅट व SNF मशीनद्वारे तपासणी करूनच दूध स्वीकारावे, अशा सूचना स्थानिक पातळीवर दिल्या जात आहेत.
चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’ नक्कीच धडकी भरवणारा ठरत आहे.






















