कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पती, सासरा आणि सासू यांच्याविरुद्ध कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत विवाहितेचे नाव पूजा उत्कर्ष गोटे (वय २४, मूळ रा. शिरेगाव, ता. गंगापूर) असे असून ती सध्या माहेर असलेल्या हतनूर येथे राहत होती. शुक्रवारी (१२ जून) सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास तिने गळफास घेऊन जीवन संपविल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा हिचा विवाह साडेतीन वर्षांपूर्वी झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांपासून पती उत्कर्ष गोटे, सासरा दिगंबर गोटे आणि सासू रंजना गोटे हे तिला विविध कारणांवरून टोमणे मारत होते. नवीन घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयांची मागणी, तसेच भांडीकुंडी, दागिने आणि गर्भावस्थेदरम्यानच्या वैद्यकीय खर्चासाठी वारंवार पैशांची मागणी केली जात होती, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
तसेच संबंधितांकडून पूजाला शिवीगाळ, मारहाण, उपाशी ठेवणे आणि मानसिक त्रास देण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सततच्या शारीरिक व मानसिक छळामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मृत विवाहितेचे वडील प्रभाकर रतन मोहिते यांच्या तक्रारीवरून कन्नड ग्रामीण पोलिसांनी पती उत्कर्ष दिगंबर गोटे, सासरा दिगंबर विश्वनाथ गोटे आणि सासू रंजना दिगंबर गोटे (सर्व रा. शिरेगाव, ता. गंगापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ८८, १०८, ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुंढे हे सहायक पोलिस निरीक्षक गिते यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.






















