सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे “सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व वाहतूक सुरक्षा” याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना आजच्या काळातील महत्त्वाच्या आव्हानांबद्दल, विशेषतः सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थांच्या सेवनाचे धोके याबद्दल शिक्षित करणे हा होता.
डॉ. श्री. चंद्रशेखर हळींगळे यांनी तरुणांमधील अमली पदार्थांच्या सेवनाचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी अंमली पदार्थाच्या सेवनास ‘नाही’ म्हणण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि व्यायाम व ध्यानधारणा यांसारख्या आरोग्यदायी सवयींद्वारे तणावाचा सामना करण्याच्या उपाययोजनांवर विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

श्रीमती रूपाली बोबडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे सांगली) यांनी विद्यार्थ्यांनी डिजिटल सायबर गुन्हयांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच सोशल मिडीयाचा सुरक्षित वापर कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनोळखी लिंक्स, APK फाईल्स वर क्लिक न करणेबाबत अवाहन केले.
पोलीस अधीक्षक सांगली, मा. श्री. तुषार दोशी यांनी सायबर गुन्हे व अंमली पदार्थाचा वापर हे समाजा समोर असलेले मोठे आव्हान असलेबाबत सांगीतले. डीजीटल अरेस्ट, जादा परताव्या देणाऱ्या फसव्या योजना, अनोळखी लिंक्स द्वारे होणारे फसवणूक अशा सायबर गुन्हयांची माहीती देवून त्यांनी विद्यार्थ्यांना सतर्क राहण्यास, आपल्या कुटुंबाला शिक्षित करण्यास आणि सुरक्षेबाबतच्या कोणत्याही समस्येसाठी ‘११२’ (112) या आपत्कालीन हेल्पलाइनचा तसेच सायबर हेल्पलाईन नंबर 1930 चा वापर करण्यास प्रोत्साहित केले.
सदर कार्यक्रम हा सांगली पोलीस दलाच्या आधिकृत YouTube Channel वरूनही Live प्रक्षेपित करण्यात आला होता. सांगली जिल्हयातील विविध शाळा व महाविद्यालयांना या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित राहण्याबाबत पोलीस दलातर्फे अवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे विविध शाळा व महाविद्यालयांतील 19 ते 20 हजार विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थिती दर्शविली.






















