पुणे: वनवृत्तातील वनपाल संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदल्यांबाबत आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वनसंरक्षक (प्रादेशिक), पुणे कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, वपअ संशोधन, पुणे येथे कार्यरत असलेल्या वनपाल श्रीमती मिरा ज्ञानोबा केंद्रे यांची बदली वनपाल, वेळवंड वनपरिक्षेत्र, भोर येथे करण्यात आली होती. या पदासाठी समितीने श्रीमती विद्या दत्तात्रय गंगजे यांच्या नावाची शिफारस केल्याची नोंदही संबंधित आदेशात करण्यात आली आहे.बदली आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांना 31 मे 2026 पूर्वी कार्यमुक्त करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, आदेश जारी होऊन जवळपास एक महिना उलटल्यानंतरही मिरा केंद्रे या अद्याप त्यांच्या पूर्वीच्या वपअ संशोधन, पुणे विभागातच कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रशासकीय आदेशानंतरही बदलीची अंमलबजावणी का झाली नाही, याबाबत वन विभागात विविध चर्चांना उधाण आले आहे. बदलीचे स्पष्ट आदेश असतानाही संबंधित अधिकारी अद्याप जुन्याच ठिकाणी कार्यरत असल्याने यामागे कोणाचे प्रशासकीय पाठबळ आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.दरम्यान, मिरा केंद्रे यांना अद्याप कार्यमुक्त का करण्यात आले नाही, तसेच बदली आदेशाची अंमलबजावणी नेमकी कोणाच्या निर्देशामुळे रखडली आहे, याबाबत वन विभागाकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळणे अपेक्षित आहे. मात्र मिरा केंद्रे यांना कार्यमुक्त न करण्यामागे नेमका आका कोण? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.






















