गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : प्रत्येक पात्र मतदाराने गणना प्रपत्र भरून देऊन लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आवाहन
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ( एस . आय . आर . ) – २०२६ अभियानाला बीड जिल्ह्यात अधिक गती देण्यात आली असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली दि . ७ ते १० जुलै या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिरांमध्ये प्रत्येक पात्र मतदाराचे गणना प्रपत्र अचूकपणे भरून घेणे , आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे तसेच मतदार यादी अधिक अचूक , पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यावर भर देण्यात येत आहे .
अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक , उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे पाटील , उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी कविता जाधव यांच्या समन्वयातून संपूर्ण निवडणूक व महसूल यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे . काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः बीड शहरात घरभेटी देत अभियानाचा शुभारंभ केला होता . त्यानंतर सातत्याने आढावा बैठका , प्रत्यक्ष पाहणी आणि क्षेत्रभेटी घेऊन कामाला अधिक वेग देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . त्याच अनुषंगाने उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी विशेष आदेश निर्गमित करून बूथस्तरीय अधिकारी , ग्रामपंचायत अधिकारी , ग्राम महसूल अधिकारी , कृषी सहाय्यक , पोलीस पाटील , महसूल सेवक , सरपंच , ग्रामपंचायत सदस्य तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांना अभियानात सक्रिय सहभाग घेण्याच्या सूचना दिल्या आहेत .
प्रत्येक गावात विशेष शिबिरे सुरू करण्यात आली असून बूथस्तरीय अधिकारी यांच्यासह नियुक्त सहाय्यक कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून गणना प्रपत्रांचे वाटप , भरणे आणि पडताळणीचे काम करीत आहेत . पावसाळ्याचा विचार करून शिबिरांसाठी सुरक्षित व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . गावोगावी दवंडी , ध्वनिक्षेपक , समाजमाध्यमे आणि स्थानिक जनप्रतिनिधी यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये , यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे .
सध्या जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात स्वस्त धान्य दुकानदार , ग्राम रोजगार सेवक , ग्राम महसूल अधिकारी , महसूल सेवक , कृषी सहाय्यक आणि इतर सहाय्यक कर्मचारी यांची बूथस्तरीय अधिकारी यांच्या सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . त्यामुळे घराघरात पोहोचून गणना प्रपत्रांचे वितरण , माहितीची पडताळणी आणि नागरिकांना मार्गदर्शन करण्याचे काम अधिक प्रभावीपणे सुरू आहे . नागरिकांकडूनही या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी स्वयंप्रेरणेने मतदार गणना प्रपत्र भरून देत आहेत .
प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की , गणना प्रपत्र भरताना नाव , पत्ता , जन्मतारीख , भ्रमणध्वनी क्रमांक , आधारविषयक तपशील , अद्ययावत छायाचित्र आणि आवश्यक कागदपत्रे अचूकपणे उपलब्ध करून द्यावीत . जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की , ” अचूक , पारदर्शक आणि सर्वसमावेशक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीचा मजबूत पाया आहे . प्रत्येक पात्र मतदाराची नोंद होणे अत्यंत आवश्यक असून कोणताही मतदार वंचित राहू नये , यासाठी सर्वांनी बूथस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे . ” तसेच अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक , उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज घोडे पाटील आणि उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनीही सर्व नागरिकांनी विशेष शिबिरांना उपस्थित राहून आपले गणना प्रपत्र वेळेत भरून द्यावे आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियान यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा , असे आवाहन केले आहे .
जिल्ह्यातील २ हजार ४१६ मतदान केंद्रांवरील २१ लाख ९३ हजार ८२७ मतदारांपैकी आतापर्यंत ६ लाख ७९ हजार ५५० गणना प्रपत्रांचे वितरण पूर्ण झाले असून हे प्रमाण ३० . ९८ टक्क्यांवर पोहोचले आहे . त्यापैकी १ लाख ४७ हजार ५३० गणना प्रपत्रांचे संगणकीकरण पूर्ण झाले असून १ लाख ४६ हजार ९२९ प्रपत्रांची बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात आली आहे . जिल्ह्यातील कामाचा वेग दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने आगामी काही दिवसांत उर्वरित सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले आहे .
तालुकानिहाय आढाव्यात अंबाजोगाई तालुका सर्वाधिक आघाडीवर असून तेथे १ लाख १७ हजार २३८ गणना प्रपत्रांचे वितरण करून ५० . ५६ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे . त्यापाठोपाठ वडवणी ( ४५ . ९१ टक्के ) , धारूर ( ४३ . २० टक्के ) , माजलगाव ( ३७ . ५१ टक्के ) , गेवराई ( ३६ . २३ टक्के ) , केज ( ३२ . ५३ टक्के ) , शिरूर ( ३१ . ८२ टक्के ) , पाटोदा ( २९ . ९६ टक्के ) , आष्टी ( २५ . ७१ टक्के ) , परळी ( २१ . ९७ टक्के ) तर बीड तालुक्यात ६७ हजार २०० गणना प्रपत्रांचे वितरण करून १५ . ३९ टक्के प्रगती नोंदविण्यात आली आहे . प्रत्येक तालुक्यातील प्रगतीचा दररोज आढावा घेतला जात असून ज्या भागात प्रगती कमी आहे , तेथे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे .