सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट स्कूलची विद्यार्थिनी कु. प्रिषा प्रवीण घोलप हिने शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. राज्यभरातील अव्वल बुद्धिबळपटूंमध्ये झालेल्या या स्पर्धेत प्रिषाने बुद्धिमत्ता, संयम आणि अचूक डावपेचांच्या जोरावर विजेतेपद मिळवत सिन्नरसह नाशिक जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले.
प्रिषा ही दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावची कन्या असून तिच्या या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थांसह विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अवघ्या नवव्या वर्षापासून बुद्धिबळाची आवड जोपासणाऱ्या प्रिषाने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवले आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, मदुराई, जळगाव, सोलापूर, अहिल्यानगर, तमिळनाडू आणि नाशिक येथे झालेल्या स्पर्धांमध्येही तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या यशामागे वडील प्रवीण घोलप आणि आई भगवती घोलप यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि समर्पणाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि प्रिषाची जिद्द यामुळेच तिने हे यश संपादन केले आहे.
राज्यस्तरीय विजेतेपदामुळे प्रिषाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीची वाट अधिक भक्कम झाली असून भविष्यात ती महाराष्ट्रासह देशाचे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सिक्रेट हार्ट स्कूलच्या प्राचार्या, शिक्षकवृंद, क्रीडाप्रेमी, मान्यवर तसेच मोहाडी ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






















