(शिरपूर प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे यांनी महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
मनसेकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या असून, काही ठिकाणी ग्राहकांची स्पष्ट संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले आहे. कोणत्याही ग्राहकाला पूर्ण माहिती न देता किंवा त्यांची लेखी संमती न घेता स्मार्ट मीटर बसविणे योग्य नाही. महावितरणने प्रथम ग्राहकांना या योजनेची संपूर्ण माहिती, अटी, कार्यपद्धती आणि तक्रार निवारण प्रक्रिया स्पष्ट करावी.
स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मनात वीज बिलातील बदल, तांत्रिक अडचणी, प्रीपेड प्रणाली लागू होण्याची शक्यता, तसेच भविष्यातील सेवा व तक्रार निवारणाबाबत विविध प्रश्न आणि चिंता आहेत. या सर्व शंकांचे समाधान पारदर्शकपणे करणे ही महावितरणची जबाबदारी आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्पष्टपणे सांगते की, ग्राहकांच्या अधिकारांचा सन्मान राखून, त्यांची संमती घेऊन आणि सर्व नियमांचे पालन करूनच स्मार्ट मीटर बसविण्यात यावेत. नागरिकांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये.
महावितरणने ही बाब गांभीर्याने न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे यांनी दिला आहे.
–
पुनमचंद आनंदा मोरे
शिरपूर तालुका अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना






















