गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या देखरेखीखाली बीड तहसील कार्यालयामार्फत सामाजिक सुरक्षा योजनांतील वृद्ध , दिव्यांग , अंध व निराधार लाभार्थ्यांसाठी दि. १३ व १४ जुलै २०२६ रोजी जुनी पंचायत समिती परिसरातील संजय गांधी विभाग , तहसील कार्यालय , बीड येथे विशेष आधार सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिरामध्ये आधार पडताळणी , आधार अद्ययावतीकरण तसेच आधाराशी संबंधित विविध तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली .
शासनाच्या संजय गांधी निराधार योजना , श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना , दिव्यांग पेन्शन योजना तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांचे अनुदान व मानधन थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते . यासाठी लाभार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत असणे , बायोमेट्रिक माहिती अचूक असणे तसेच आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असणे अत्यावश्यक आहे .
या विशेष शिबिरात आधार प्रमाणीकरण न होणे , डोळ्यांचे आयरीस स्कॅन अयशस्वी होणे , बोटांचे ठसे जुळत नसणे , बायोमेट्रिक पडताळणीतील अडचणी , आधार कार्डातील माहिती दुरुस्ती , आधार अद्ययावतीकरण , मोबाईल क्रमांक नोंदणी , तसेच आधाराशी संबंधित विविध तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे . विशेषतः वयोमानामुळे अथवा शारीरिक अडचणींमुळे बायोमेट्रिक पडताळणी होत नसलेल्या वृद्ध , अंध व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे .
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आवाहन केले आहे की , ज्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण होत नाही , बोटांचे ठसे उमटत नाहीत , डोळ्यांचे स्कॅन होत नाहीत , आधार कार्डामध्ये दुरुस्ती आवश्यक आहे किंवा आधाराशी संबंधित कोणतीही तांत्रिक अडचण आहे , अशा सर्व लाभार्थ्यांनी दि. १३ व १४ जुलै २०२६ रोजी सकाळी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा . आधार अद्ययावत झाल्यास शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ नियमित व विनाअडथळा मिळण्यास मदत होणार आहे .
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ एकाही पात्र लाभार्थ्यापासून वंचित राहू नये , यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून शिबिर यशस्वी करावे , अशा सूचना दिल्या आहेत . अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी लाभार्थ्यांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश दिले असून , उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी सर्व पात्र लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेऊन आधार अद्ययावत करून घ्यावा , असे आवाहन केले आहे .
शिबिराच्या नियोजनासाठी नायब तहसीलदार अण्णा वंजारे , नायब तहसीलदार संभाजी थोटे , हेमलता परचाके , वैशाली बहिरवाळ , महेंद्र राऊत हे समन्वयाची जबाबदारी पार पाडत असून , आधार केंद्राचे सुपरवायझर राहुल जोगदंड व ऑपरेटर आदेश शिंदे हे शिबिरात लाभार्थ्यांना आधार नोंदणी , अद्ययावतीकरण व बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी आवश्यक सहकार्य करणार आहेत .
प्रशासनाच्या वतीने सर्व पात्र वृद्ध , दिव्यांग , अंध व निराधार लाभार्थ्यांनी आधार कार्ड , बँक पासबुक , मोबाईल क्रमांक व आवश्यक कागदपत्रांसह दि. १३ व १४ जुलै २०२६ रोजी आयोजित विशेष आधार सेवा शिबिरास उपस्थित राहून या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा , असे संयुक्त आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक , उपविभागीय अधिकारी कविता जाधव तथा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे .






















