‘महसूल तुमच्या दारी’ उपक्रमाला जामनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शासनाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली
जळगाव| प्रतिनिधी-(विनोद पवार) जामनेर येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला तालुकाभरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लाभांचे वितरण
शिबिरात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात तालुक्यातील लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
५,२२० लाभार्थ्यांना २१,४६९ लाभ
या विशेष शिबिरात तब्बल ५ हजार २२० लाभार्थ्यांना २१ हजार ४६९ विविध शासकीय लाभांचे वितरण करण्यात आले. विविध योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
२७ विभागांची ३२ माहिती व सेवा केंद्रे
शिबिरात २७ शासकीय विभागांची ३२ माहिती व सेवा केंद्रे उभारण्यात आली होती. महसूल, ग्रामविकास, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, सामाजिक न्याय, शिक्षण, दिव्यांग कल्याण, पंचायत राज, रोजगार हमी, बँकिंग तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आदी विभागांनी विविध योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिली.
विविध योजनांचा लाभ
यावेळी प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना, कृषी यांत्रिकीकरण, शिष्यवृत्ती, दिव्यांग कल्याण, सामाजिक सुरक्षा योजना तसेच महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आला. नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करून शासनाच्या योजनांचा लाभ अधिक सुलभ करण्यावर भर देण्यात आला.
> “शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. महसूल समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.”
— गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य






















