शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. ग्रामीण व आदिवासी भागातील युवक-युवतींना सैन्य, पोलीस तसेच विविध सुरक्षा दलांच्या भरतीसाठी दर्जेदार आणि मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन श्री राहुल विश्वासराव रंधे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्राची स्थापना किसान विद्या प्रसारक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून करण्यात आली आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील प्रत्येक होतकरू विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण भरतीपूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी, कोणताही विद्यार्थी आर्थिक किंवा भौगोलिक कारणांमुळे या संधीपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. याच ध्येयातून भविष्यात परिसरातील विविध गावांमध्ये अशाच प्रकारच्या आणखी प्रशिक्षण शाखा सुरू करून अधिकाधिक युवक-युवतींना लाभ मिळवून देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत, अशा प्रशिक्षण केंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून त्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्यासाठी भक्कम व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर आपले ध्येय साध्य करावे, असे प्रेरणादायी मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त श्री शशांकजी रंधे, बनूमाय कन्या शाळेचे शाखाप्रमुख श्री गणेश भामरे, संस्था क्रीडा प्रमुख प्रा. राकेश बोरसे, श्री चंद्रकांत बडगुजर, श्री आकाश वसावे, श्री दशरथ पावरा, श्री जितेंद्र पावरा, श्री विजेंद्र जाधव, श्री दीपक पवार, श्री हेमंत शिरसाठ, श्री भरत मराठे, श्री सागर कोळी, श्री प्रज्वल महाले आणि श्री यश शितोळे यांच्यासह परिसरातील नागरिक, पालक व मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते.कार्यक्रमात प्रशिक्षण केंद्राच्या उद्दिष्टांची माहिती देण्यात आली. केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्ती, मैदानी सराव, लेखी परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास तसेच सैनिकी शिस्तीचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, ग्रामीण भागातील युवकांना राष्ट्रसेवेच्या दिशेने सक्षम बनविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेच्या क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत, बोराडी शाखा ग्रामीण भागातील युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
























