गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. हा निर्णय राज्यातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये आरोग्यसेवा अधिक सक्षम, सुलभ व परिणामकारक करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण आणि जनहिताचा टप्पा आहे.
या शासन निर्णयांच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांनी दिनांक ४ ऑगस्ट २०२६ पासून ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत तसेच पुढे बेमुदत आरोग्यसेवा बंदचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर नॅशनल इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन (NIDA) महाराष्ट्रातील जनतेला स्षष्ट्रपणे आश्वस्त करू इच्छिते की, राज्यातील सर्व आयुष डॉक्टर आपले दवाखाने नियमितपणे सुरू ठेवून रुग्णांना अखंड, सुरक्षित, जबाबदार व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देतील. कोणताही नागरिक उपचाराअभावी वंचित राहू नये, हीच आमची सर्वोच्च नैतिक, सामाजिक आणि व्यावसायिक बांधिलकी आहे.
महाराष्ट्र शासनाने CCMP संदर्भातील निर्णय हा विद्यमान कायदेशीर तरतुदी, तज्ज्ञ समित्यांच्या शिफारशी, राज्यातील आरोग्यसेवेची वास्तविक गरज आणि जनहित यांचा सखोल विचार करून घेतला आहे. BHMS पदवी पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञन विद्यापीठ (MUHS) मार्फत मान्यताप्राप्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये CCMP अभ्यासक्रम राबविला जातो. या अभ्यासक्रमामध्ये MBBS, MD व MS तज्ज्ञ प्राध्यापकांकडून अध्यापन तसेच प्रत्यक्ष क्लिनिकल प्रशिक्षण दिले जाते.
CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांच्या स्वतंत्र नोंदणीसंदर्भात महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय संबंधित वैधानिक तरतुदींवर आधारित आहे. सदर शासन निर्णयवर सध्या कोणताही न्यायालयीन स्थगिती आदेश अस्तित्वात नाही, त्यामुळे शासनाच्या निर्णयाविरोधात आरोग्यसेवा विस्कळीत होईल अशा प्रकारची भूमिका घेणे हे जनहिताच्या दृष्टीने उचित ठरत नाही.
रुग्णांना उपचारांपासून वंचित ठेवणे किंवा आरोग्यसेवेत अडथळा निर्माण होणे हे कोणत्याही परिस्थितीत जनहिताशी सुसंगत नाही. त्यामुळे आयुष डॉक्टर समाज रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देत आपली वैद्यकीय सेवा अखंडपणे सुरु ठेवणार असून, महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील.
आम्ही स्वष्ट्रपणे नमूद करू इच्छितो की, आयुष डॉक्टरांचा संघर्ष कोणत्याही वैद्यकीय शाखेविरुद्ध नसून, कायदेशीर मान्यता, समान न्याय, व्यावसायिक सन्मान आणि राज्यातील जनतेला अधिक सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आहे. आम्ही सर्व वैद्यकीय शाखांचा सन्मान करतो आणि परस्पर सहकार्यावर आधारित सक्षम आरोग्यव्यवस्थेवर विश्वास ठेवतो.
IMA च्या बंदमुळे राज्यातील कोणत्याही रुग्णाला उपचारांपासून वंचित राहावे लागले किंवा आरोग्यसेवेत अडथळे निर्माण झाले, तर त्यासंबंधीची
नैतिक व सांर्वजनिक जबाबदारी संबंधित बंद पुकारणान्या संघटनांवर राहील. दुसरीकडे, नॅशनल इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन (NIDA) व राज्यातील आयुष डॉक्टर समाज आपल्या वैद्यकीय शपयेप्रमाणे, व्यावसायिक नैतिकतेचे पालन करत आणि संविधानिक मूल्यांचा आदर राखत जनतेच्या सेवेसाठी अविरत कार्यरत राहील.
शेवटी, महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आमचे आवाहन आहे की, कोणत्याही अफवा किंवा संभ्रमावर विश्वास ठेवू नये. आवश्यक आरोग्यसेवेसाठी आपल्या परिसरातील आयुष डॉक्टरांशी निःसंकोच संपर्क साधावा, महाराष्ट्रातील आयुष डॉक्टर समाज प्रत्येक रुग्णाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून, रुग्णसेवेलाच सर्वोच्च धर्म मानतो.
“रुग्णसेवा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता.”
नॅशनल इंटिग्रेटेड डॉक्टर्स असोसिएशन (NIDA) चे कार्यकारणीतील
डॉ. अमोल आंबेकर राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ योगेश भालेराव राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ अल्ताफ खान राष्ट्रीय सचिव डॉ ओमप्रकाश गुर्जर राष्ट्रीय कोषाध्यक्ष डॉ करणसिंह गाडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे






















